सिंधुदुर्ग- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. आज मविआने मालवणात मोर्चा जाहीर केला होता. याप्रसंगी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे हे मविआच्या नेत्यांसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. ते किल्ल्यावर असतानाच भाजपाचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कार्यकर्त्यांसह पोहोचले. दोघेही नेते एकाच वेळी किल्ल्याच्या आवारात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. एकमेकांविरुद्ध कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर वातावरण अधिकच तापले. कोणत्याही क्षणी दंगल उसळेल अशी भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली होती. आदित्य ठाकरे यांनी मागच्या दाराने किल्ल्यावरून जावे, अशी राणेंची मागणी होती तर आम्ही मुख्य प्रवेशद्वारातूनच किल्ल्याबाहेर जाणार, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली. यामुळे स्थितीत अधिकच चिघळली. कार्यकर्ते आणि नेते इतके संतप्त होते की कोणत्याही क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली असती. पोलिसांनी काही वेळातच संपूर्ण फौज तैनात केली. मात्र त्यांनाही कोणालाही आवरता येत नव्हते. या स्थिती कोणती तरी दुर्घटना घडेल, अशी भीती निर्माण झाली होती. हा संपूर्ण प्रकार घडलाच कसा? असा प्रश्न आहे. त्याचबरोबर हे सर्व घडत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे होते? हा दुसरा महत्त्वाचा सवाल आहे. सुदैवाने शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ठाकरे आणि राणे यांच्यात मध्यस्थी करून मार्ग काढला आणि दोन तासांच्या प्रचंड तणावाच्या स्थितीनंतर दोघेही नेते आणि कार्यकर्ते आपापल्या मार्गाने निघून गेले. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या निर्धारानुसार ते मुख्य दरवाज्यातूनच किल्ल्याबाहेर पडले.
आज मविआचे नेते आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विनायक राऊत, वैभव नाईक, राजन साळवी, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील हे सर्व कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी पाहणी सुरू केली. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या मूर्तीतही भाजपा चोरी करू शकते हे आता उघड झाले आहे. या मूर्तीचे कंत्राट कुणी दिले? मूर्तिकार कुठे आहे? तो फरार कसा झाला? मिंधेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे आणि भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे हा पुतळा पडला आहे. आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत असतानाच किल्ल्याच्या पायथ्याशी भाजपा नेते नारायण राणे आणि पुत्र निलेश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि किल्ल्यावर जाण्याचा आग्रह करू लागले. पोलिसांनी त्यांना तिथे थांबविण्याचा
प्रयत्न केला त्यावेळी निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे पोलिसांशी हुज्जत घालत म्हटले की, त्यांना तिथून बाहेर काढा. आम्ही किती वाजता येणार हे आधी कळविले होते. एसपी आणि कलेक्टर यांना आधीच वेळ दिला होता. तरीही हे लोक येथे कसे आले? त्यांना आता मागच्या दाराने बाहेर काढा. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरे आपली भूमिका सोडत नव्हते आणि राणेही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांचा अक्षरशः पोस्टमन झाला होता.
राणेंचा निरोप ठाकरेंपर्यंत पोहोचवायचा आणि ठाकरेंचा निरोप राणेंपर्यंत पोहोचवायचा. हे करणेच पोलिसांच्या हाती राहिले होते. पोलिसांची परिस्थिती अत्यंत हतबल झाली होती. नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारापासून हटायला तयार नव्हते. तिकडे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले की, मी मुख्य प्रवेशद्वारानेच किल्ल्याबाहेर जाणार. माझ्या कार्यकर्त्यांना मी रोखले आहे. नाहीतर त्यांनी सर्वांना कधीच साफ केले असते. आम्ही शांतपणे आलो असताना पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना येऊ कसे दिले. हे सर्व फडणवीसांनी घडवून आणले आहे. आदित्य ठाकरे आणि मविआचे नेते आपल्या मागणीवर ठाम राहत तेथेच ठिय्या देऊन बसून राहिले. प्रवेशद्वारापाशी असलेले राणे आणि त्यांचे कार्यकर्तेही हटत नव्हते. दोन्हीकडचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. मध्येच संताप अनावर झाल्याने दगडफेकही झाली. त्यात एक पोलीस जखमी झाला.
परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवार गटाचे जयंत पाटील पुढे आले आणि त्यांनी नारायण राणे, निलेश राणे, आदित्य ठाकरे, वैभव नाईक या सर्वांनी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही फारसे कोणी ऐकत नव्हते. जवळजवळ दीड तास हा प्रकार सुरू होता. अखेरीस पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून मविआच्या नेत्यांना किल्ल्याबाहेर नेण्यासाठी दहा फुटाचा रस्ता मोकळा केला. मविआचे नेते आणि कार्यकर्ते किल्ल्याबाहेर या रस्त्याने जात असताना दोन्हीकडील कार्यकर्ते घोषणाबाजी करणार नाहीत असा समझोता झाला आणि अखेर आदित्य ठाकरे संपूर्ण पोलीस बंदोबस्तात इतर नेत्यांसह आणि कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर पडले.
मविआचे 1 सप्टेंबरला ‘जोडे मारो’ आंदोलन
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मविआ सरकारच्या विरोधात 1 सप्टेंबरला ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे. उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 1 सप्टेंबरला मुंबईतील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून आम्ही गेट वे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहोत. तिथे सरकारच्या निषेधार्थ जोडो मारो आंदोलन केले जाईल. यावेळी मी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले आदी नेते उपस्थित राहतील.
नारायण राणे आक्रमक,
पण धमक्या देणार नाहीत!
आज मालवणच्या राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकेकाला घरात शिरून रात्रभर मारेन, अशी धमकी दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, राणे साहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे. ते कोणाला धमक्या वगैरे देतील, असे मला वाटत नाही.