आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी! विधिमंडळ आमदारांचा नेता बनवले

मुंबई – विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा विधिमंडळ नेता, विधानसभा गटनेता आणि प्रतोद यांची निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाल्याने आदित्य ठाकरे यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव आणि प्रतोद म्हणून पुन्हा सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. या आमदारांच्या आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीला विधान परिषदेचे सदस्यही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्या नावाची विधिमंडळ नेता म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे दोन्ही सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम असतील. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील पक्षफुटीनंतर विधानसभेचे गटनेते असलेले एकनाथ शिंदे यांच्या जागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती झाली होती. आता त्यांच्या जागी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. भास्कर जाधव सहाव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. दिंडोशीचे आमदार असलेले उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्ती सुनील प्रभू गेल्या विधानसभेतही उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद होते. त्यांची पुन्हा प्रतोदपदी निवड झाली आहे. प्रभू यांच्या सहीनेच ठाकरे गटाचे सगळे निर्णय घेतले जातील.
या बैठकीनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड झाली आहे. आदित्य ठाकरे यांची निवडदेखील नियमाप्रमाणे झाली आहे. तांत्रिक प्रक्रिया पार पडल्यानंतर आम्ही विधान भवनात जाऊन याची माहिती देऊ. भास्कर जाधव म्हणाले की, माझी गटनेतेपदी निवड झाली आहे, हे अनपेक्षित आहे. मी ग्रामीण भागात राहतो. मुंबईमध्ये राहणार्‍या व्यक्तीला मंत्रालयात येणे-जाणे सोयीचे ठरते. त्यामुळे मुंबईतील नेत्याची निवड व्हावी, यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा मी आग्रह धरला होता. पण उद्धव ठाकरेंनी माझी निवड केली. तसा आदेश दिला, त्यामुळे तो मी स्वीकारला.
महाविकास आघाडीतील कुठल्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणार्‍या 29 जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार असे म्हटले जात आहे. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असताना ते म्हणाले की, विरोधी पक्षाबाबत तिन्ही पक्ष एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतील. अजून सरकार बनले नाही, सरकारवर कोणी दावा केलेला नाही. त्यामुळे सरकार बनल्यावर विरोधी पक्ष नेत्याविषयी चर्चा होईल. तर भास्कर जाधव यांनी मात्र, विरोधी पक्षनेतेपदाची सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
आमदार फुटू नये म्हणून
शपथपत्रे लिहून घेतली

आजच्या बैठकीत ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून शपथपत्रे लिहून घेण्यात आली. पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार. त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे हे प्रतिज्ञापत्र आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडून उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला होता. आता नव्याने निवडून आलेले महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, याबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, यात नवीन काहीच नाही. ही नेहमीची प्रकिया आहे.

फडणवीसांना तुम्ही
20 पुरून उरा

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, समोर फडणवीस असले, तरी तुम्ही वीस आहात. त्यांना पुरून उरा. शिवसेना स्थापनेच्या काळात वामनराव माहडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते. त्यावेळी त्यांनी एकटे असूनही विधानसभा गाजवली होती. पण आता तुम्ही 20 आहात, त्यामुळे जनतेचे मुद्दे उचलून आणि आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा गाजवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top