मुंबई- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील आदित्य आणि अमित हे दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. उद्धव ठाकरे यांचे पुत्र विद्यमान आमदार आदित्य हे वरळी तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दोघांच्याही अधिकृत संपत्तीची माहिती हाती आली आहे. त्यानुसार आदित्य ठाकरेंकडे 21 कोटींहून अधिक संपत्ती आहे तर अमित ठाकरेंकडे 13.5 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तरुण वयात त्यांच्याकडे असलेली संपत्ती सामान्यजनांचे डोळे दीपवणारी आहे.
राज्याचे माजी पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरे यांच्या संपत्तीची सध्या तुलना होत आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार 34 वर्षांच्या आदित्य ठाकरे यांच्याकडे 15 कोटी 43 लाख रुपयांची जंगम, तर 6 कोटी 48 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता अशी 21 कोटी 91 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत 5.74 कोटींची वाढ झाली आहे. तर 32 वर्षीय अमित ठाकरे यांच्याकडे 12 कोटी 54 लाख रुपयांची स्थावर आणि 94 लाख 14 हजार 220 रुपयांची जंगम अशी एकूण 13 कोटी 48 लाख रुपयांची मालमत्ता आहे. आदित्य ठाकरे यांनी आपला व्यवसाय सामाजिक व राजकीय सेवा असा नमूद केला असून, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतात पगाराचाही समावेश आहे. अमित ठाकरे यांचा व्यवसाय ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्युटिव्ह असा आहे. आदित्य ठाकरेंनी उत्पन्नाचा स्रोत व्याज, भाडे, डिव्हिडंड व पगार असा दिला आहे. तर अमित ठाकरे यांनी उत्पन्नाच्या स्रोतामध्ये राज ठाकरे यांना दिलेल्या 84 लाखांच्या कर्जाच्या व्याजापोटी मिळालेली रक्कम दाखवली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या नावावर बँकेतील ठेवी व रक्कम मिळून 2 कोटी 81 लाख रुपये आहेत. तर अमित ठाकरे यांच्या नावावर बँकेत एकूण 6 कोटी 29 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण 1 कोटी 91 लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आहेत. त्यात एक सोने आणि हिर्याचे कडे असून त्यावर 535 हिरे आहेत. 47 लाखांची आणखीही दोन सोन्याची कडी त्यांच्याकडे आहेत. 1 किलो 466 ग्रॅमची सोन्याची नाणी आणि बिस्किटे आहेत. त्यांची किंमत 1 कोटी 90 लाख आहे. तर अमित ठाकरे यांच्याकडे केवळ 2 लाख 40 हजार रुपयांचे सोने आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावावर एक बीएमडब्ल्यू कार आहे. तिचे विमा मूल्य 4 कोटी 21 लाख आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर मात्र एकही वाहन नाही.
आदित्य यांच्या नावावर पाच ठिकाणी शेतजमीन आहे, त्यांची किंमत 1.88 कोटी आहे. ठाण्यातील घोडबंदर येथे त्यांच्या नावावर दोन दुकाने आहेत. त्याची किंमत 4 कोटी 66 लाख आहे. अमित ठाकरे यांची तथास्तु बिल्डर्समध्ये 20 टक्के भागिदारी, सह्याद्री फिल्ममध्ये 50 टक्क्यांची भागीदारी आहे. अमित यांच्या पत्नी मिताली ठाकरेच्या नावे 1 कोटी 72 लाख रुपये जंगम मालमत्ता, 58 लाख 38 हजार 578 इतकी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 5 कोटी 93 लाखांच्या ठेवी आहेत. म्युचुअल फंडामध्ये 52 लाख तर 9 तोळ्यांचे सोने आहे. मुलाच्या नावावर 70 हजार तर मुलाच्या नावे म्युच्युअल फंडात 60 लाख रुपये आहेत.
दोन्ही ठाकरेंनी कर्ज घेतले
अमित ठाकरे यांच्या नावावर 4 कोटी 19 लाख 99 हजार 508 रुपयांचे कर्ज असून, आदित्य ठाकरेंवर 43 लाख रुपयांचे कर्ज आहे. अमित ठाकरे यांनी आई शर्मिला ठाकरे यांच्याकडून 3.65 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. बहीण उर्वशी ठाकरेंकडून 21 हजार
कर्ज घेतले, आजी मधुवंती ठाकरेंकडून 1 लाख 61 हजारांचे कर्ज घेतले तर पत्नी मितालीकडून 47.71 लाखांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे.