नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवली. त्याच्या शेजारी स्वत:साठी दुसरी खुर्ची ठेवून त्यावर आतिशी बसल्या. आतिशी यांनी म्हटले की, केजरीवाल यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी राहील.
मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच आतिशी यांनी सांगितले की, मी दिल्लीची मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. आज माझ्या मनात तशाच वेदना आहेत जशा भरताच्या मनात प्रभू रामचंद्र १४ वर्षांसाठी वनवासाला गेले होते, तेव्हा होत्या. प्रभू रामचंद्र भरताला कारभार सांभाळावा लागला होता. भरताने १४ वर्षापर्यंत प्रभू रामचंद्रांच्या पादुका सांभाळल्या आणि कारभार पाहिला. तसेच पुढच्या चार महिन्यांत मी पण दिल्लीचे सरकार चालवणार आहे.