Home / News / आता शुक्र ग्रहावर धडक! 1236 कोटींचा खर्च

आता शुक्र ग्रहावर धडक! 1236 कोटींचा खर्च

नवी दिल्ली – चंद्र आणि मंगळानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आता शुक्र ग्रहावर धडक देणार आहे. इस्रोच्या शुक्रयान उपग्रह...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – चंद्र आणि मंगळानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आता शुक्र ग्रहावर धडक देणार आहे. इस्रोच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला सरकारने परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
इस्रोचे संचालक देसाई म्हणाले की, ‘शुक्रयान’ या व्हिनस ऑर्बिटिंग उपग्रह प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 28 मार्च 2028 रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मिशनसाठी 1,236 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे अभियान पाच वर्षे चालणार आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशनचा उद्देश शुक्राचे वातावरण, पृष्ठभाग आणि सूर्यासोबत त्यावर होणार्‍या प्रक्रियांचा अभ्यास करणे हा आहे. या मोहिमेद्वारे इस्रो शुक्र ग्रह समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या मिशनमध्ये 19 पेलोडचा समावेश असेल. यापैकी 16 पेलोड भारतीय असतील, दोन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहयोगी पेलोड असतील आणि एक आंतरराष्ट्रीय पेलोड असेल. व्हीनस ऑर्बिटर मिशन या मोहिमेद्वारे शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि भूपृष्ठाचा अभ्यास केला जाणार आहे. शुक्राच्या वातावरणातील प्रक्रिया आणि रचनेचे विश्लेषण केले जाईल. शुक्राचे आयनोस्फियर आणि त्याची गतिशीलता तपासली जाईल. सौर किरणोत्सर्गासह शुक्राचा परस्परसंवादाचा अभ्यास केला जाईल. शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील उत्क्रांतीविषयक फरक जाणून घेण्यासाठीही संशोधन केले जाईल.
चांद्रयान-4 संदर्भातही देसाई यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, चांद्रयान-3चा पाठपुरावा म्हणून चांद्रयान-04 राबवले जाणार आहे. या मिशनमध्ये आपण केवळ चंद्रावरच उतरणार नाही. तर चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने घेऊन येणार आहोत.

Web Title:
संबंधित बातम्या