आता मतदान केल्यावर शाई नाही! लेझर खूण

नवी दिल्ली – बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’वर आधारित असेल. ईव्हीएम मशीन म्हणजे मतदान यंत्रामध्ये एक कॅमेरादेखील असेल, जो मतदान करताना मतदारांचा फोटो टिपणार आहे.
यंदा होणार्‍या पाच राज्यांत या नव्या तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे मतदानातील गैरप्रकार दूर होण्यास मदत होईल, असे निवडणूक आयोगाला वाटत आहे.
निवडणूक आयोग सध्या या नव्या तंत्राच्या चाचण्या घेत आहे. प्रचलित पद्धतीनुसार, मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीला (पहिले बोट) शाई लावली जाते. ही शाई तुमच्या बोटावर पुढचे काही दिवस टिकून राहते. मतदान करण्यापूर्वी पोलिंग ऑफिसर तुमच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही ना हे तपासून बघतो. शाई असेल तर, मतदाराने आधीच मतदान केले आहे, असा त्याचा अर्थ आहे. साहजिकच ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी अपात्र ठरते. मात्र, अनेकदा काहीतरी क्लुप्ती वापरून बोटावरची शाई पुसतात आणि बोगस आणि दुबार मतदान केले जाते.
नव्या तंत्रज्ञानामुळे मतदानातील हे गैरप्रकार थांबतील. लेझरने केलेली खूण अनेक दिवसांनंतरही पुसणे शक्य होत नाही. त्यामुळे नखांवर लेझरची खूण केलेली व्यक्ती पुन्हा मतदानास आल्यास सहज पकडली जाईल.
ईव्हीएममध्ये असलेला कॅमेरा मतदाराचा फोटो टिपेल. त्यामुळेही बोगस आणि दुबार मतदानाला आळा बसेल. ईव्हीएममधील कॅमेरा दुसर्‍यांदा मतदानाला येणार्‍या व्यक्तीची ओळख पटवून त्याचा अलर्ट अधिकार्‍याला पाठवेल. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल.
यंदा मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्याच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत ही नवी प्रणाली वापरली जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला तर येणार्‍या लोकसभा निवडणुकीत ही प्रणाली लागू करण्यात येईल. गेल्या काही निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये छेडछाडीचा आरोप करून या मशिनवर संशय घेतला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न
करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top