नवी दिल्ली-विमान प्रवासात प्रवाशांना इंटरनेट सेवा मिळत नाही. मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. मात्र, आता लवकरच विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुढाकार घेतला आहे.
कॅलिफोर्नियातील वायसॅट ही जागतिक उपग्रह संपर्क कंपनी भारतीय आकाशात इंटरनेट संपर्क प्रदान करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.भारताने या वर्षांच्या अखेरीस आपला सर्वांत उच्च-तंत्र उपग्रह ‘जीसॅट-२०’ प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे.जर सर्व काही योजनेनुसार पार पडले तर या उपग्रहामुळे भारतीय आकाशात इंटरनेट सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होईल. हा शक्तीशाली उपग्रह बंगळुरू येथील इस्त्रो अंतर्गत यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरने तयार केला आहे.हा उपग्रह एक संपर्क उपग्रह आहे जो यापूर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपेक्षा सर्वाधिक प्रगत आहे.हा उपग्रह वेगाने डेटा पाठवू शकतो. या उपग्रहामुळे विमानात इंटरनेटचा वापर प्रवाशांना करता येणार आहे.यासाठी जागतिक उपग्रह कंपनी वायसॅट इस्रोला मदत करणार आहे. भारतीय सशस्त्र दलांनाही हा उपग्रह वेगाने संपर्क प्रदान करणार असल्याने याचा संरक्षण दलाल देखील फायदेशीर ठरणार आहे.