नवी दिल्ली-देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू झाली आहे. आता वंदे भारत स्लीपर ट्रेनदेखील सुरू होणार आहे. आगामी तीन महिन्यात ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. ही ट्रेन जानेवारी २०२५ पासून धावण्याची अपेक्षा आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आली आहे.वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एसी ३ टायर,एसी २ टायर,आणि एसी प्रथम श्रेणी सारख्या सुविधा असतील,ज्यामुळे प्रवास अतिशय आरामदायी आणि सोयीस्कर होईल. ही गाडी राजधानी नवी दिल्लीहून संध्याकाळी ७ वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीनगरला पोहोचणार आहे.म्हणजे ही गाडी १३ तासांपेक्षा कमी वेळात ८०० किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मार्गात अंबाला, लुधियाना, जम्मू तवी आणि कटरा या प्रमुख स्थानकांचा समावेश असेल.या गाडीसाठी एसी ३ टियरसाठी सुमारे २ हजार रुपये, एसी २ टियरसाठी २५०० रुपये आणि एसी प्रथम श्रेणीसाठी ३ हजार रुपये तिकीट दर असेल.भविष्यात या गाडीचा बारामुल्लापर्यंत विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार!
