नवी दिल्ली – केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे या कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक बाजारात ‘बफर स्टॉक’मधून विक्री मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे,असे ग्राहक कल्याण खात्याच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले.
सचिव निधी खरे म्हणाले की,दिल्लीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो ३८ रुपये होते.ते वर्षभरात ५५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई आणि चेन्नईमध्ये देखील कांद्याचा दर अनुक्रमे ५८ आणि ६० रुपये प्रतिकिलो एवढा झाला आहे.त्यामुळे केंद्र सरकारने दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांत घाऊक बाजारात ‘बफर स्टॉक’मधील कांद्याची विक्री सुरू केली आहे.पाच सप्टेंबरपासून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि ‘नाफेड’च्या मोबाइल व्हॅन आणि दुकानांमधून ३५ रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे.त्या पार्श्वभूमीवर देशभरात अनुदानित दराने कांद्याची किरकोळ विक्री वाढविण्याची सरकारची योजना आहे.