जुन्नर- वनविभाग आता जुन्नर परिसरातील बिबट्याचा उपद्रव रोखण्यासाठी गाववस्तीत शिरू पाहणार्या बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठी चक्क अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यामुळे बिबट्या गावात येण्याआधीच गावकऱ्यांना त्याची चाहूल लागेल. उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती घुसखोरी लक्षात घेऊन जुन्नर भागात सर्वात आधी याचा वापर करण्यात आला आहे.
या विशेष योजनेमध्ये मिनी कम्प्यूटरचा वापर करण्यात आला आहे. यंत्रणेत परिसरातील बिबट्यांचे फोटो सेव्ह केले आहेत. एका स्वयंचलित कॅमेऱ्याद्वारे आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे ही यंत्रणा काम करते. ३५ मिटरहून दूरची प्रतिमा या कॅमेऱ्यात कैद होते. एआय मशिन लर्निंग, डीप लर्निंग अल्गोरिदमच्या आधारे काम सुरु करते. तीन सेकंदात मशिन बिबट्याची ओळख पटवते आणि तातडीने यंत्रणा अलर्ट करते.
यंत्रणेद्वार गावात १२० डेसिबलचा म्हणजेच जेट विमानाच्या आवाजाएवढा सायरन वाजतो. तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि वनविभागाचे कर्मचारी यांना एसएमएस जातो. विशेष गमतीचा भाग म्हणजे या कॅमेऱ्यापुढे इतर कोणतीही व्यक्ती किंवा प्राणी आला तर यंत्रणा सायरन देत नाही. आंबेगाव तालुक्यात या यंत्रणेचा प्रथमच वापर होत आहे. हे एआय तंत्रज्ञान असल्याने ते कमालीचं अचूक आहे.