नवी दिल्ली
दिल्ली विद्यापीठाने टीबीचे निदान एका तासात करणारी नवीन चाचणी शोधून काढली आहे. विशेष म्हणजे या चाचणीला अवघा ५० रुपये खर्च येणार आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या बी. आर. आंबेडकर जैव चिकित्सा संशोधन केंद्राने एक खास किट तयार केले आहे. यातून टीबीचे निदान तासाभरात करता येणार आहे. या किटचे पेटंट घेण्यात आले आहे. आता कंपनी उत्पादनासाठी प्रयत्न करत आहे.
बी. आर. आंबेडकर जैव चिकित्सा संशोधन केंद्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दमन सलूजा म्हणाले की, ‘नवीन तंत्रज्ञामुळे चाचणीचे रिपोर्ट लवकर मिळून रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील. छोट्या प्रयोगशाळेत सुद्धा ही चाचणी होऊ शकते. आम्ही सर्व क्लीनिकल चाचण्या केल्यानंतर हे उत्पादन तयार केले. याला लँप इजी पद्धत किंवा थर्मल पीसीआर पद्धतही म्हणतात. या किटचा खर्च केवळ ४० ते ५० रुपये आहे. आम्ही हजार नमून्यांच्या चाचण्या केल्या. छातीतील टीबीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही पारंपारिक चाचण्यांसोबत आमच्या किटच्या चाचण्यांची तुलना केली.’ दरम्यान, क्षयरोग हा जीवघेणा आजार असला तरीही तो योग्य उपचार करून बरा होऊ शकतो. या रोगाचे निदान करण्याची पद्धत फारच वेळखाऊ व महागडी आहे. मात्र आता या नव्या चाचणीमुळे वेळ आणि पैसे दोघांचीही बचत होईल व लवकरात लवकर रुग्णाला योग्य उपचार मिळतील.