सांगली- आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मागील दोन दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या २४ तासामध्ये तासगाव मंडलात तब्बल ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले.
गेल्या आठवड्यात सांगली शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.आता जिल्ह्यातील काही भागातही पावसाने जोर धरला आहे. मघा नक्षत्रात पहिल्यांदा विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.पावसाने जोर धरल्याने शेतीतील कामे खोळंबली. तासगाव तालुक्यात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहते झाले आहेत. येरळा आणि अग्रणी नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले होते. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत.