लखनऊ – रामपूरचे माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रामपूरच्या विशेष खासदार-आमदार न्यायालयाने बुधवारी हेट स्पीच प्रकरणी निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने आझम खान यांची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे या शिक्षेनंतर त्यांचे आमदारकीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
आझम खान यांच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी बुधवारी रामपूरच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आझम यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, याआधी रामपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता विशेष खासदार-आमदार न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०२२ रोजी आझम यांच्याविरोधात निकाल दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आझम यांचे वकील विनोद शर्मा म्हणाले, “आम्हाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. ज्या द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांमध्ये आम्हाला शिक्षा सुनावण्यात आली होती, आता न्यायालयाने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे. जे १८५ प्रकरणांशी संबंधित होते, त्यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे.” मात्र, गेल्या वर्षी या प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आझम यांची आमदारकी रद्द करण्यात आली. यानंतर रामपूरमध्ये पोटनिवडणूक झाली.