मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यात उद्या तीन महत्त्वाचे मेळावे होणार असून या मेळाव्यातील भाषणांविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा पाॅडकास्टही आहे .
शिवसेना पांरपारिक मेळावा शिवतीर्थावर होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा नागपूरला होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
राज्यातील चार हिंदूत्ववादी पक्ष या मेळाव्यातून आपली भूमिका मांडणार आहेत. ‘भगवा फिका पडू देणार नाही’ असे शिवसेना उबाठाचे घोषवाक्य असून ‘हिंदुत्वाचा हुंकार महाराष्ट्राची ललकार’ हे घोषवाक्य एकनाथ शिंदे यांच्या टिझरमध्ये आहे. ‘मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा’ या वाक्यातून राज ठाकरे यांनी आपली भूमिका दाखवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आपल्या भाषणातून भाजपाला कोणता सल्ला देतात हे ऐकणारी महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्याच्या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्यांची दृश्ये व बाळासाहेबांचा आवाज निष्ठावान शिवसैनिकांना साद देत आहे. एकनाथ शिंदेच्या मेळाव्याच्या टिझरमध्येही बाळासाहेबांच्या विचारांचाच उल्लेख आहे. राज ठाकरे यांनी ‘पूर्वीसारखा सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारुया’ अशी साद राज ठाकरे यांच्या जाहिरातींमधून घालण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची प्रचाराची दिशा, पक्षाची धोरणे, महत्त्वाचे प्रश्न, राज्याचे भविष्य या विषयी या मेळाव्यातून चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज ‘विचारांचे सोने ‘ लुटणार ? तीन महत्त्वाचे मेळावे! एक पॉडकास्ट
