मुंबई- मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी उद्या शनिवार २० जुलै रोजी १२.३०
ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत या चार तासांच्या कालावधीत विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे.त्यामुळे शनिवारी लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, काही एक्सप्रेसलाही त्याचा फटका बसणार आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरही ब्लॉकचा परिणाम होणार आहे.
कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.या पुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीच मध्य रेल्वेचा शनिवारी रात्री १२.३० पासून पहाटे ४.३० वाजेपर्यंत असा चार तासांचा ब्लॉक असणार आहे.या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड अशा लोकल सेवा बंद असणार आहेत. तसेच, मेगाब्लॉकमुळे इतर लोकल व लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होणार आहे.या काळात मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा,परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येतील.तर हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.तसेच या स्थानकातून पनवेल दिशेकडे लोकल धावतील.
मेगाब्लॉकपूर्वी रात्री १२.१४ वाजता सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल असेल.तर रात्री १०.३४ वाजता कल्याण ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.त्याचप्रमाणे ब्लॉकनंतर पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी ते कर्जत पहिली लोकल असेल आणि ब्लॉकनंतर पहाटे ४ वाजता ठाणे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल. ब्लॉकपूर्वी रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी ते पनवेल शेवटची लोकल असेल.तर रात्री १०.४६ वाजता पनवेल ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.ब्लॉकनंतर पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी ते पनवेल पहिली लोकल असेल आणि पहाटे ४.१७ वाजता वांद्रे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.या मेगाब्लॉकमुळे हावडा ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस,भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा – सीएसएमटी या गाड्या दादरपर्यंतच चालवल्या जातील.