मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या काही तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी २९ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वेच्या माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.५ ते दुपारी ३.५५ पर्यंत आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरही रविवारी रात्री १२.३० ते सकाळी १०.३० पर्यंत १० तासांचा ब्लॉक असणार आहे.
मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ पासून ते दुपारी ०३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला,घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या मुलुंडपुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.या सेवा आपल्या गंतव्य स्थानावर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबाने पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५८ पासून ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबविल्या जातील आणि माटुंगा स्थानकापासून पुढे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.ही सेवा गंतव्य स्थानावर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.