आज मध्य आणि हार्बरमार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २२ सप्टेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप- डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.

मेगाब्लॉक कालावधीत मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी फास्ट सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. तर कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/सेमी जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकावर थांबतील आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील व सुटतील.डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर पहिली बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.०५ वाजता सुटेल.

दरम्यान,हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१९ ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top