मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार २७ आॅक्टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग, हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी ते अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत ब्लॉक असेल.मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशीपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.