मुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर उद्या रविवार २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीवरून सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेतीन या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार असून त्या १५ मिनिटे उशिरा चालविल्या जातील. तर ठाण्यापुढील जलद सेवा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर बोरीवली-गोरेगाव अप-डाऊन धिम्या मार्गावर. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन स्लो मार्गावरील सेवा अप आणि डाऊन फास्ट मार्गावर चालवल्या जातील. यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द केल्या आहेत. काही अंधेरी आणि बोरीवली गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही गाड्या चालविल्या जाणार नाहीत.
दरम्यान हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर पनवेल – सीएसएमटीदरम्यान सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी- पनवेल/बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत बंद राहतील.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालतील. ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाइन सेवा उपलब्ध असतील.तर बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.