चेन्नई -आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत आहे. त्यात ते गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांचं कौतुक करताना म्हणतात की, म एकदा ते तापाने फणफणत असताना त्यांनी गोमूत्र प्राशन केलं. त्यानंतर ते लगेच बरा झाला.
कामकोटी १५ जानेवारी २०२५ रोजी मट्टू पोंगलच्या दिवशी ‘गो संरक्षण शाळे’त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. तिथे ते देशी गायींचे संरक्षण करणे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याविषयी बोलत होते. त्याचवेळी त्यांनी गोमूत्रामुळे आपला ताप दूर केल्याची गोष्ट सांगितली.
त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. कामकोटी यांचे वक्तव्य हे हास्यास्पद आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. द्रमुक नेते टी. के. एस. एलंगोवन म्हणाले की, देशाची शिक्षणव्यवस्था बिघडवणं हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आणखी एक नेते के. रामकृष्णन म्हणाले की, कामकोटी यांनी जे काही दावे केले आहेत त्याबाबतचे पुरावे देखील सादर करायला हवेत. त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू.