आजपासून 3 दिवस आमदारांचा शपथविधी! हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकरांची निवड

मुंबई – कालच्या शपथविधीनंतर आज महाराष्ट्रात वरवरची राजकीय शांतता होती. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोघे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीला जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दादर नायगावमधील भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली. उद्यापासून तीन दिवस अधिवेशन होणार आहे. उद्या व परवा असे दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल. त्यानंतर सोमवार 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. 16 डिसेंबरपासून नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.
आज विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. कालिदास कोळंबकर हे 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आज त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिवसभर त्यांच्या सागर बंगल्यावरच होते. अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी येत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजही अदृश्यच राहिले. त्यांनी गृह आणि नगरविकास खाते मागितले आहे ही चर्चा सुरूच होती. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दादरला सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
16 डिसेंबर ते 21 डिसेंबर विधिमंडळ अधिवेशन असून, त्याआधी खातेवाटप आणि मंत्रिपद वाटप होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आज प्रत्येक गटाने कोणती खाती मागितली यावरच चर्चा सुरू होती. मात्र अधिकृत कोणतीही घोषणा आज दिवसभरात झाली नाही. 9 डिसेंबरपर्यंत नवीन आमदारांचा शपथविधी आणि अध्यक्षांची निवड ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खातेवाटप जाहीर होईल, अशी आशा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top