मुंबई – मुंबई कोस्टल रोड अर्थात मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उद्या रविवार २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सोमवारपासून संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. यामुळे मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या ९ मिनिटात होणार आहे. सध्या सकाळी ७ ते मध्यरात्री १२ यावेळेतच या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.
मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी धर्मवीर स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. या कोस्टल रोडची पहिली मार्गिका मागील वर्षी १२ मार्च रोजी खुला झाली. त्यानंतर थेट वांद्रेपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला आहे. दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत.
हे पूल बांधण्यासाठी प्रथमच बो आर्च स्ट्रिंग गर्डर स्थापन करण्यात आले आहेत. या पुलांमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेले आहेत. रविवारी कोस्टल मार्गिकेच्या अंतिम टप्प्यासोबत वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील तीन आंतरमार्गिका ही सुरू करण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या आंतरमार्गिका अमरसन्स, हाजी अली व वरळी अशा असून खुल्या होणाऱ्या आंतरमार्गिका वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या असणार आहेत.
आजपासून सकाळी ७ ते रात्री १२मुंबई कोस्टल रोड प्रवास सुरू
