कणकवली- “आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस” असे बॅनर कणकवलीत झळकले आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर हे बॅनर कणकवली तालुक्यात लागले आहेत. बॅनरवर म्हटले आहे की, श्रीधर नाईक अमर रहे, श्रीधर नाईक आम्हाला माफ करा, सत्यविजय भिसे अमर रहे, सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा. आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस असे बॅनरवर लिहिले आहे . कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासार्डे याठिकाणी लावलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
काल ठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे या सत्काराचा संदर्भ घेत हे बॅनर लावल्याची चर्चा आहे . श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात परशुराम उपरकर संशयित आरोपी होते. मात्र त्यानंतर ते निर्दोश सुटले होते. तर सत्यविजय भिसे केसमध्ये राजन तेली हे संशयित आरोपी होते. ते देखील या केसमध्ये निर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर हा संदर्भ घेत भाष्य करणारे हे बॅनर असल्याची चर्चा कणकवलीत आहे. मात्र, हा बॅनर कोणी लावला? ते अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.