आकुर्ली,एक्सर मेट्रो स्थानकांचा
कारभार आता महिलांच्या हाती

मुंबई – सध्याच्या युगात अंतराळापासून जमिनीपर्यंत असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे महिलांचा बोलबाला नाही.त्यामुळे आता मुंबईतील नव्यानेच सुरू झालेल्या आकुर्ली आणि एक्सर दोन मेट्रो स्थानकातील सर्व कामे महिलाशक्ती करणार आहे. मेट्रो चालविणे,स्टेशन व्यवस्थापन ते प्रवाशांच्या सुरक्षेपर्यंतची अशी सर्व कामे महिला करणार आहेत. एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.येत्या ८ मार्चला असलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे.

आता मुंबई मेट्रो प्रशासनाने मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या मेट्रो स्थानकांच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांपर्यंत ७६ महिला कर्मचाऱ्यांमार्फत या दोन स्थानकातील सर्व कामे महिला कर्मचारी करणार आहेत.या स्थानकांवरील सर्व-महिला कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करणार आहेत, त्यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साइज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक,ग्राहक सेवा अधिकारी आदी अधिकारी मेट्रो प्रवाशांना सेवा देणार आहेत.तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छता सांभाळतील.हा उपक्रम केवळ परिवहन व्यवसायातील महिलांच्या क्षमता सिद्ध करणारा नसून इतर महिलांनाही या क्षेत्रात करीयर करण्यासाठी प्रेरीत करणारा ठरेल असे एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने म्हटले आहे. या मेट्रोच्या कारभारासाठी सुमारे ९५८ म्हणजे २७ टक्के महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Scroll to Top