महाबळेश्वर
दर चार वर्षांनी फुलणाऱ्या कारवी जातीच्या विविध प्रकारांतील ‘आकरा’ या वनस्पतीला फुले येऊ लागली असून ‘आकरा’च्या फुलांनी महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट बहरले आहे. या वनस्पतीचे नाव वनस्पती शास्त्रातील ‘लेपिडोग्याथास कुस्तीडाटा’ असे ठेवले आहे. या वनस्पतीची फुले पांढऱ्या रंगाची असतात. २०- २५ टोकदार पानांच्या झुपक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व औषधी मधासाठी या प्रकारच्या फुलोऱ्याला विशेष महत्व असते.
दर सात वर्षांनी फुलणारी कारवी व्हाईटी या कारवीच्या प्रकारातही दर सात वर्षांनीच फुले येतात. आकरा या प्रकारात दर चार वर्षांनी फुले येतात. यातीलच खरवर या प्रकारात दर सोळा वर्षांनी फुले येतात. प्रत्येक हंगामात येणाऱ्या फुलोऱ्याच्या वेळी मधमाशा त्या-त्या फुलांमधून जो मध गोळा करतात त्याला त्या त्या प्रकारचा मघ म्हणून संबोधला जाते. जसे सध्या आकरा जातीच्या कारवी फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात जमा होणारा मध आकराचा मध म्हणून फारच महत्त्वाचा असतो.
या वनस्पतीला फुले येतात त्यावेळी तिची पाने कडक टोकदार बनतात व आपण किंवा अन्य प्राण्याने त्यास तोड वा हात लावल्यास ती काट्यासारखी टोचतात. त्यामुळे या फुलोऱ्याच्या काळात मधमाशा व्यतिरिक्त कोणी प्राणी, पक्षी त्याच्याजवळ जात नाही. डिसेंबरमध्ये सुरु झालेला या वनस्पतीचा फुलोरा साधारण मार्चपर्यंत कमी-अधिक प्रमाणात असतो, अशी माहिती महाबळेश्वर मध संचालनालयाचे सेवानिवृत संचालक वसंतराव पाटील यांनी दिली.