पुणे-खवय्यांच्या विशेष पसंतीच्या आंबेमोहोर तांदळाचा हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच तांदूळ महागला आहे. मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथून शहरातील बाजारपेठेत दाखल होणार्या तांदळाच्या दरात यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्विंटलमागे भाव ५०० ते १ हजार रुपयांनी वाढला आहे. मागील वर्षीच्या हंगामात सुरुवातीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये असणारे दर यंदा ८ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.
सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. या तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांत होते. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने खाल्ला जातो.महाराष्ट्रात येणार्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८० टक्के तांदूळ हा मध्य प्रदेश, तर उर्वरित २० टक्के तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन घटलेले आहे. परिणामी, आंबेमोहोर तांदळाचे दर बासमती तांदळाच्या दरांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.