सावंतवाडी – दुसर्या शाळेत तात्पुरत्या कामगिरीवर पाठवलेली पदवीधर शिक्षिका पुन्हा शाळेत हजर व्हावी, या मागणीसाठी तालुक्यातील आंबेगाव जिल्हा परिषद नंबर एकच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडले. जोपर्यंत शिक्षिका शाळेत हजर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा पालकांनी दिला. अखेर संबंधित शिक्षिका आंबेगाव शाळेत तातडीने हजर होईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंबेगाव शाळेला यावर्षी रसिका नाईक या पदवीधर शिक्षिका मिळाल्या होत्या; मात्र शाळेत नियुक्ती होऊनही त्यांना २० दिवसांसाठी कुणकेरी शाळेत कामगिरीवर पाठविण्यात आले. शिक्षण विभागाच्या या धोरणाविरोधात शिक्षक, पालकांनी त्यावेळीच आवाज उठवला होता; परंतु मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २० दिवसांच्या मुदतीवर ग्रामस्थांनी माघार घेतली होती. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून संबंधित शिक्षिकेला आंबेगाव शाळेत हजर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती; अन्यथा आंदोलनाची भूमिकाही घेतली होती.
तशा आशयाचे लेखी निवेदनही त्यांनी दिले होते. तरीही संबंधित शिक्षिका शाळेत हजर न झाल्याने पालकांनी हे शाळा बंद आंदोलन छेडत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता अंगणातच बसवले. जोपर्यंत शिक्षिका हजर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,असा पवित्रा पालकांनी घेतला. या आंदोलनाची दखल घेत संबंधित शिक्षिकेला आंबेगाव शाळेत हजर होण्याचे आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात आले. याबाबत केंद्रप्रमुख म. ल.देसाई यांच्या विनंतीवरून हे आंदोलन मागे घेण्यात आले.