पुणे-जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शासनाने या गोष्टीची दखल घेऊन येथील रहिवाशांचे तत्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.आदिवासी भागात डिंभे धरणालगत असलेल्या पंचाळे खुर्द गावाच्या दुसऱ्या बाजूला जमिनीला भेगा पडल्या असून या भेगा दोन ते तीन फूट खोल व ६० ते ७० फूट लांब आहेत.२००३ साली अशाच प्रकारे भूस्खलन झाले होते.त्यावेळी भूगर्भ तज्ज्ञांनी जमिनीची पाहणी करून येथील ४५ कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी शिफारस केली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने आपत्कालीन पुनर्वसन जाहीर करण्यात आले होते. प्रत्येकी कुटुंबाला चाळीस हजार रुपये मदत स्वरूपात देण्याचे ठरले होते. गावठाणाची मोजणी देखील झाली होती.मात्र,प्रकरणाची फाईल ही मंत्रालयातच पडून असल्याने पुढची कारवाई झाली नाही व ही कुटुंबे अजूनही त्याच ठिकाणी वास्तव्य करत आहेत.