देवगड – अस्सल देवगड हापूस हा परदेशातही प्रसिद्ध आहे.मात्र हाच खरेदी करताना ग्राहकांची वारंवार फसवणूक होत असते. ही फसवणूक टाळण्यासाठी आणि देवगड हापूसचा दर्जा अबाधित राखण्यासाठी आता प्रत्येक हापूस आंब्याला युनिक कोड मिळणार आहे. जामसंडे येथे झालेल्या चर्चासत्रात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे,अशी माहिती देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अॅड.अजित गोगटे यांनी दिली.
अॅड.अजित गोगटे यांनी सांगितले की, युनिक कोड आंबा उत्पादक संस्थेमार्फत वितरित केले जाणार आहेत.युनिक कोडचा बनावट वापर होऊ नये, यासाठी शेतकऱ्याना त्यांची तालुक्यातील आंबा कलमे त्यांच्या ७-१२ उताऱ्यावर तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून कोड दिले जाणार आहेत.असे कोड मिळण्यासाठी प्रत्येक शेतकरी जीआयधारक असायला हवा.आंब्यासाठी वापर होण्याचे हे पहिले वर्ष असल्याने या कोडचे स्टिकर छापून तयार होण्यासाठी आणि त्यांची यंत्रणेमध्ये नोंद होण्यासाठी ४५ दिवस लागणार आहेत.त्यामुळे १० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यानी संस्थेकडे नोंदणी करावी.
अस्सल देवगड हापूसला मिळणार ‘युनिक कोड’
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/eb796f43-3685-4671-a6c9-bcd2a5dc879a-1024x546.jpg)