पुसद – राज्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून व तलाठी यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता ‘सहायक महसूल अधिकारी’ व ‘ग्राम महसूल अधिकारी’ असे पदनाम करण्यात आले आहे. यापुढे महसूल विभागात जुने पदनाम दिसणार नाही. या निर्णयामुळे महसूल कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महसूल विभाग हा शासनाचा कणा असून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर कामकाज करण्यात येते. या महसूल विभागातील काही पदांचे पदनाम बदलण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली होती. अव्वल कारकून यांना कामकाजांचे नियंत्रण करताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधताना महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गास एक विशिष्ट पदनाम असणे आवश्यक आहे. त्यांना सहायक महसूल अधिकारी, असे पदनाम देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारे बऱ्याच वर्षांपासून केली होती. तसेच आता कोतवाल यांना ‘महसूल सेवक’ करण्यात आले आहे.
महसूल विभागातील कनिष्ठ लिपिकांचे पदनाम यापूर्वीच महसूल सहाय्यक म्हणून बदलले आहे. आता बदलण्यात आलेल्या पदनामामुळे तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपिक, अव्वल कारकून असे पदनाम दिसणार नाही.