वाराणसी – काँग्रेसचे माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश राय याच्या हत्येप्रकरणी यूपीतील बाहुबली मुख्तार अन्सारी याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल ३२ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. मुख्तार सध्या बांदा कारागृहात दुसऱ्या एका प्रकरणात शिक्षा भोगतोय.
कोळसा व्यापाऱ्यांकडून वसुली प्रकरणी ब्रिजेश सिंग आणि मुख्तार अन्सारी यांच्यात वाद होता. अवधेश राय ब्रिजेश सिंग टोळीशी संबंधित होता. त्यावरून अन्सारी आणि त्याच्यात वाद होता. याच वादातून ३ मे १९९१ रोजी अवधेशची त्याच्या घराजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुख्तार अन्सारीसह माजी आमदार अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह आणि राकेश श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयात हा खटला बराच काळ प्रलंबित होता त्यानंतर तो एमपीएमएलए न्यायालयात वर्ग करण्यात आला. तिथे या न्यायालयाची सुनावणी होऊन आज न्यायालयाने अवधेश राय हत्याप्रकरणी मुख्तार अन्सारीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील अब्दुल कलाम आणि कमलेश सिंह या दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. राकेश श्रीवास्तवने आपल्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालवण्यासाठी दुसऱ्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तिथे त्याच्यावरील खटला प्रलंबित आहे. मुख्तार अन्सारी आणि भीम सिंह सध्या तुरुंगात आहेत.