*शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
नाशिक :
राज्यात विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला. याचा फटका शेतीला बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तसेच इतर भागातील कांदा उत्पादक हावालदीन झाला आहे. उन्हाळ कांद्याच्या काढणीचे काम जोमाने सुरू असताना पाऊस पडला.
अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, सटाणा आदी भागातही मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावून शेती पिकांचे नुकसान केले आहे. एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बाजारभाव वाढेल तेव्हा कांदा विक्री करू या हेतूने कांदा साठवण्याची सुरुवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. मात्र त्या आधी तीन-चार दिवस सलग गारपिटीमुळे काढून ठेवलेला आणि शेतातील कांदा ओला होऊन सडू लागला. दहा ते पंधरा टक्केही कांदा हातात येणार नसल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरीही निघणार नसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने या अस्मानी संकटाने संपूर्ण स्वप्नांवर पाणी फिरवल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत होते.