नवी दिल्ली – यंदा आंब्यासाठी पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका बसला आहे. वादळी वारे आणि गारपिटीसह उष्णतेमुळे पिकांची नासाडी तर झालीच आहे. पण आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आंब्याच्या उत्पादनात दोन मोठी राज्ये उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये आंब्यांचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशच्या आंब्यांची बाजारातील आवक दरवर्षीच्या तुलनेत यंदा खूप कमी आहे. दोन्ही राज्यातील आंबा उत्पादक तसेच वितरकही फारसे उत्साही नाही. परंतु आंध्र प्रदेशातील आंबे मेच्या अखेरीस बाजारात पोहोचणार आहेत. मात्र दोन्ही राज्यांतील आंबा उत्पादक आणि वितरकांचा दावा आहे की, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे आंब्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणणे आहे की, जेथे आंब्याचा मोहोर झडला आहे, तेथे काही प्रमाणात भरभाई होण्याची शक्यता आहे. कारण यामुळे आंब्यांचा आकार या ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. आयसीएआरने गृहीत धरले आहे की सरासरी तोटा २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडावरील संपूर्ण घड गळून गेल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर फुले उरलेली नाहीत. अशा स्थितीत उत्पादन वाढण्याची शक्यता कमी आहे.