अवकाळी पावसाचा महाराष्ट्रात हाहाकार! मोठी जीवितहानी

बुलढाणा- राज्यभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरच्या काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळून भिंतीखाली दोन मुली दबल्याची घटना घडली. कृष्णाली आणि राधा अशी या मुलींची नावे आहेत. यातील कृष्णाली या दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर राधा हिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

बुलढाण्यातील जवळपास सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय येथे गारपीटही झाली. खामगाव तालुक्यात अंबिकापुर शेतात वीज पडून गोपाल महादेव कवळे या चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच गारपिटीमुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पाऊस बरसला. यात पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, राज्यभरात विविध ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. सिल्लोड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात वीज पडून ३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात १० एप्रिलपर्यंत हे वातावरण कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे

Scroll to Top