अमरावती : गेल्या आठड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा पश्चिम विदर्भातील ९१२ गावांना फटका बसला आहे. यामुळे अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील २६ हजार दोनशे शेतकऱ्यांच्या २०,३७६ हेक्टर शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीचा यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६५३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यासह वाशीम आणि बुलढाणा मध्ये झालेल्या फळपिकांचे नुकसान मोठे आहे. तर अकोला जिल्ह्यात ३,४७६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. तर नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटेमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील जवळपास ११ हजार शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला समोर जावे लागले आहे.