नवी दिल्ली- देशाच्या उत्तर भागात सुरु असलेल्या थंडीच्या तीव्र लाटेने उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांत धुक्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे रेल्वे व विमान वाहतूकीला विलंब झाला. सलग दुसऱ्या दिवशीही उत्तरेतील बहुतांशी भागातील दृश्यमान्यता शून्यावर पोहोचली आहे. त्यामुळे २०० ट्रेन आणि ४०० विमानांना विलंब झाला, तर १९ उड्डाणे रद्द झाली. हवामान खात्याने म्हटले आहे की, दाट धुक्याचा परिणाम १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर झाला. ही थंडीची लाट पुढील दोन दिवसही कायम राहणार आहे.
थंडी व दाट धुक्यामुळे दिल्लीतील पालम, सफदरजंग, जम्मू काश्मीरचे श्रीनगर, हरियाणातील हिसार, पंजाबात पाटियाला, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, उत्तर प्रदेशातील बरेली, झाशी, बहराइच, वाराणसी, आग्रा, गझियाबाद, लखनौ, कानपूर या शहरांमध्य दाट धुके दाटले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, राजस्थानातील श्री गंगानगर, बिहारमधील पूर्णिया, भागलपूर, तसेच आसामच्या गुवाहटीसह अनेक शहरांमध्येही धुक्याची चादर पसरली होती. या भागातील दृश्यमान्यता कमी झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यावरील वाहनांची गतीही कमी झाली. त्याचा परिणाम आंतरराज्यीय मालवाहतूकीवरही झाला. आज सकाळी दिल्ली, चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, गुवाहाटी येथील विमानसेवाही विलंबाने सुरु होती. या भागातील रेल्वेगाड्यांनाही तब्बल आठ तासाहून अधिक विलंब झाला. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत हजारो प्रवाशांना गाड्यांची वाट पाहत स्थानकावरच अडकून पडावे लागले.