मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवसाआधी आज भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसली. सेन्सेक्स १०२ अंकांनी घसरून ८०,५०२ वर बंद झाला. तर निफ्टी २१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,५०९ च्या पातळीवर स्थिरावला.केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. यामुळे सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात घसरला. सेन्सेक्सवर कोटक बँक, रिलायन्सचे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी अधिक घसरले. दुपारच्या व्यवहारात रिलायन्सचा शेअर्स ३.५ टक्के घसरणीसह ३,००१ रुपयांवर होता. त्याचबरोबर आयटीसी, एसबीआय, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर एनटीपीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, एम अँड एम, टाटा स्टील, टाटा मोटर्स, सन फार्मा, इन्फोसिस, मारुतीच्या शेअर्समध्ये १ ते २ टक्क्यांनी वाढ झाली.