अर्जेंटिनाच्या अध्यक्षपद निवडणुकीत जेव्हिअर मिलेईंनी बाजी मारली

ब्युनॉस आयर्स :

अर्जेंटिना अध्यक्षपद निवडणुकीत उजव्‍या विचारसरणीचे, पुरोगामी नेते अशी ओळख असणार्‍या जेव्हिअर मिलेई यांनी बाजी मारली आहे. अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच मिलेई यांचे प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी आपला पराभव मान्‍य केला. त्यांनी फोनवरुन मिलेई यांचे अभिनंदन केले. सध्‍या अर्जेटिना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सर्वसामान्‍य जनता महागाईमध्‍ये होरपळत आहे. त्यामुळे आता देशाला आर्थिक स्‍थिरतेसाठी प्रयत्‍न करण्‍याचे मोठे आव्‍हान मिलेई यांच्‍यासमोर असणार आहे.

मिलेई यांना अध्‍यक्षपद निवडणूक निकालात ५५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. मिलेई यांना पुढील चार वर्षांसाठी जनतेने अध्यक्ष म्हणून निवडले आहे, असे त्‍यांचे मुख्‍य प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी म्‍हटले आहे. वाढती महागाई, मंदीमुळे अर्थव्‍यवस्‍थेला आलेली मरगळ आणि देशभरातील वाढते दारिद्र्य यांना आळा घालण्याचे आव्‍हान मिलेई यांच्‍यासमोर असेल. निवडणूक निकाल स्‍पष्‍ट होताच ब्युनॉस आयर्सच्या डाउनटाउनमध्ये शेकडो मिलेई समर्थक रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी रॉक संगीतावर नाचत फटाके फोडत आनंदोत्‍सव साजरा केला. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिलेईचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मुक्त धोरण अर्जेंटिनाला पुन्हा एकदा एक महान देश बनवेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top