पुणे- तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. या निर्णयामुळे गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी नागपूर उपमहानिरीक्षक कारागृह अधीक्षक यांनी गवळीचा रजेचा अर्ज नामंजूर केला होता.
मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने गवळीला १४ वर्षे जन्मठेपेची शिक्षा गवळीला सुनावली होती. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीने संचित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत तो अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठात धाव घेत अर्ज दाखल केला. ‘कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध आहे. अनेकदा रजेवर सुटल्यानंतर कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन केले आहे. त्यामुळे माझी संचित रजा मंजूर करावी, अशी विनंती गवळीने खंडपीठात केली. याबाबत खंडपीठाने कारागृह उपमहानिरीक्षक यांना नोटीस पाठवून उत्तर मागितली. त्यानंतर खंडपीठाने गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली.