नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या संध्याकाळी साडेचार वाजता नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना भेटणार आहेत. या भेटीत ते आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता असून त्यांच्या जागी नव्या नेत्याची निवड केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यास व मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यानंतर केजरीवाल यांनी आपण दोन दिवसांत राजीनामा देणार असल्याची घोषणा पक्षाच्या बैठकीत केली. राज्यात महाराष्ट्राबरोबर विधानसभा निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत आता फैसला जनतेच्या न्यायालयात होईल असेही ते म्हणाले होते.
त्यानुसार आज त्यांनी नायब राज्यपालांना भेटीची वेळ मागितली असून उद्या दुपारी साडेचार वाजता ते आपला राजीनामा देतील. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री पदी येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या धक्का तंत्रानुसार ते कदाचित कुलदीप कुमार या मागासवर्गीय नेत्यालाही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देतील अशी शक्यताही राजधानी दिल्लीत व्यक्त केली जात आहे. हा निर्णय आपण गरज म्हणून घेतला असून ते आपल्या तत्त्वांच्या विरोधात आहे. असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीत आपचे सरकार आल्यापासून भाजपाने हे सरकार पाडण्यासाठी तसेच त्यांना काम करु न देण्यासाठी अनेक हातखंडे वापरले असून केजरीवाल यांचे मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार होणे हे भाजपासाठी मोठे यश समजले जात आहे. दिल्लीचे नायब राज्यपालांचेही केजरीवाल यांच्या सरकारबरोबर चांगले संबंध नसून उद्या ते आणखी एखादी खेळी खेळतील का अशीही शंका उपस्थित केली जात आहे.