मुरुड
शुक्रवारपासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छीमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील नौका धोका ओळखून तातडीने किनाऱ्यावर आल्या आहेत.मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.त्याच बरोबर खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या गुजरात, रत्नागिरी आणि बाहेर गावच्या 700 ते 800 नौका आगरदांडा बंदरात दाखल झाल्या ची माहिती राजपुरी येथील नाखवा धनंजय गिदी आणि तांडेल संतोष खरसईकर यांनी दिली .अद्याप वादळी पावसाचा जोर कायम असून जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत.
मच्छीमार रोहन निशानदार यांनी सांगितले की, बोंबील,कोलंबिचा सीझन नुकताच सुरू झाला होता. मोठी मासळीदेखील कमी-अधिक प्रमाणात मिळत होती.परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला तातडीने किनारा गाठावा लागला आहे.पुढील 3 ते 4 दिवस मोठा वादळी पाऊस आणि मोठ्या लाटा उसळणार असा इशारा असल्याने कोणताही धोका न पत्करता दुपारपासून नौका कसाबसा किनारा गाठत आहेत. मोठ्या ट्रॉलरनी खाड्यांतून आश्रय घेतला आहे.
वादळी पावसामुळे किनाऱ्याकडे आलेली अधिक खोल समुद्रात जात असते. खोल समुद्रात वादळी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असते.दरम्यान, रविवारी एकाच दिवसात रविवारी 12 तासात 100 मिमी पाऊस पडल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.