लखनौ- उत्तर प्रदेशात जाणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीक्रमात बदल झाला असून आता पर्यटक वाराणशीऐवजी अयोध्येला अधिक पसंती देत आहेत. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ११ कोटी लोकांनी अयोध्येला भेट दिली आहे. तर वाराणशीला ४ कोटी ६१ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे.
उत्तर प्रदेशाच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार मागील सहा महिन्यात ३३ कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांना भेटी दिल्या. यात ३२ कोटी ८७ लाख ८१ हजार देशांतील तर १० लाख ३६ हजार ७७४ विदेशी पर्यटकांचा समावेश होता. यातील सर्वाधिक ११ कोटी पर्यटक अयोध्येला आले. यात २ हजार ८५१ परदेशी पर्यटकांचाही समावेश होता. वाराणशीतील ४ कोटी ६१ लाख पर्यटकांपैकी विदेशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक १ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे. प्रयागराजमध्ये साडेचार कोटी, मथुरेत ३ कोटी ८ लाख तर आग्र्याला ७६ लाख ८८ हजार २१२ पर्यटकांनी भेट दिली. आग्र्याला ७ लाख ३ हजार ८६० परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. राज्यातील चांगल्या पर्यटन सेवांमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे उत्तर प्रदेशच्या पर्यटनमंत्र्यांनी म्हटले आहे.