अयोध्येत मशीद बांधण्यासाठी प्राधिकरणाची अखेर परवानगी

अयोध्या :- बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने येथे धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या पाच एकर जागेवर ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे एक मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, समूदाय स्वयंपाकघर आणि ग्रंथालय बांधण्यात येईल. प्राधिकरणाने मंजूरी न दिल्याने आणि जमिनीच्या वापरात बदल केल्यामुळे मशिदीचे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ रखडले होते. अयोध्येचे विभागीय आयुक्त आणि एडीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी शनिवारी सांगितले की, “आम्ही शुक्रवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. काही विभागीय औपचारिकतेनंतर मंजूर झालेले नकाशे काही दिवसांत इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनकडे सुपूर्द केले जातील.” याचबरोबर, दुसरीकडे, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. मंदिराच्या बांधकामावर कार्यरत असलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, मंदिर २०२४ मध्ये भाविकांसाठी उघडले जाईल.

Scroll to Top