नवी दिल्ली –
अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम प्रगतिपथावर असून हे मंदिर वर्षाअखेरीस भाविकांसाठी खुले होईल, अशी माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिर बांधकामाचा पहिला टप्पा २० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पहिल्या आणि दुसर्या मजल्याच्या बांधकामाचे काम ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. आम्ही प्रयत्न करतोय की, ३० डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पूजाअर्चा सुरू होईल.
पहिल्या टप्प्यात तळमजल्यावर पाच मंडप आहेत, यातील गर्भगृहात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. गुरू मंडप, प्रार्थना मंडप, नृत्य मंडप असे इतर मंडप आहेत. या पाचही मंडपांमध्ये १६० स्तंभ आहेत. ते नक्षीकामाने सजवलेले आहे. तसेच खालच्या मजल्यावरील स्तंभांमध्ये श्रीरामाच्या जीवनातील प्रसंग दाखवले जाणार आहेत.