छत्रपती संभाजीनगर –
मुर्तुजापूर येथे बीड बायपासजवळ हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने मेडिकल कॉलेजची उभारणी केली जात आहे. श्रीराम ट्रस्टने या प्रकल्पासाठी २५ एकर जागा दिली आहे. ही जागा देताना ट्रस्टने या परिसरात श्रीरामाचे एक मंदिर उभारावे, अशी अट घातली होती. त्यानुसार हेडगेवार ट्रस्टने या ठिकाणी भव्य श्रीराम मंदिर उभारणीचा निर्णय घेतला. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे आर्किटेक्ट असलेले आशिष सोमपुरा यांच्याकडूनच या मंदिराचे काम केले जात आहे. १६ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर हे उभारले जाणार आहे. त्यासाठी मकराना मार्बलचा वापर केला जाणार आहे. २०२४च्या अखेरीस मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. यासाठी १० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी दिली. आर्किटेक्ट आशिष सोमपुरा म्हणाले, अयोध्येतील मंदिराप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरजवळील मंदिराचे स्तंभ, घुमट, गर्भगृह असेल. दक्षिण भारतातील नागर शैलीत या मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे.