वॉशिंग्टन – अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर ट्रकच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा भारतीय नागरिक साई वर्षित कंडुलाला ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने २२ मे २०२३ रोजी व्हाईट हाऊसच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकॅडवर ट्रक चढवला होता. अमेरिकन मालमत्तेचे नुकसान करणे, सरकार उलथवून टाकण्याचा व नाझी विचारसरणीने प्रेरित होऊन हुकूमशाही स्थापित करण्याचा प्रयत्न करणे आदी आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते.
भारतातील चंदननगर येथे जन्मलेला कंडुला हा अमेरिकेचा कायमस्वरूपी रहिवासी होता. त्याच्याकडे ग्रीन कार्ड होते. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याला सरकार उलथवून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची हत्या करायची होती. त्यासाठी सहा महिन्यांपासून त्याने नियोजन केले होते. कंडुलाने २२ मे २०२३ रोजी भाड्याने ट्रक घेऊन हा हल्ला केला होता. त्यासाठी त्याला १३ मे २०२४ रोजी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयातील नोंदीनुसार, कुंडला २२ मे २०२३ रोजी सेंट लुईस येथून विमानाने वॉशिंग्टनला पोहोचला. त्यानंतर त्याने ट्रक भाड्याने घेतला. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने व्हाईट हाऊस आणि प्रेसिडेंट पार्कचे संरक्षण करणाऱ्या बॅरिकॅडवर ट्रक आदळवला. त्यानंतर त्याने ट्रकच्या मागच्या बाजूला असलेल्या बॅगेतून नाझी ध्वज काढून तो हवेत फडकवला. त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली.
अमेरिकेत व्हाईट हाऊसवर हल्ला! भारतीयाला ८ वर्षांचा कारावास
