कर्नाल – राहुल गांधी आज अमेरिकेत भेटलेल्या एका तरुणाला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी भल्या पहाटे कर्नालमधील एका गावात आले. त्यांच्या या अचानक भेटीने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. त्यावेळी ते अमित कुमार या तरुणाला भेटले होते. काही काळापूर्वी त्याचा अमेरिकेत अपघात झाला होता. त्याच्या हरियाणातील घरी जाऊन त्याला तिथून व्हिडीओ कॉल करण्याचे वचन राहुल गांधी यांनी त्याला अमेरिकेत दिले होते. त्यानुसार आज पहाटे ते अचानक कर्नाल जिल्ह्यातील घोघाडीपूर गावात पोहोचले. त्याच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी तिथून अमित कुमारला अमेरिकेत व्हिडीओ कॉल केला. राहुल गांधी यांचा हा दौरा इतका अचानक होता की त्याची माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना किंवा पोलीस प्रशासनालाही नव्हती. त्यांनी अमितची आई बिरमती आणि वडील बीर सिंग यांची भेट घेतली. त्यांच्या घरी ते २० मिनिटे थांबले. त्यांना दिलेला देशी तुपाचा चुरमा ते आवर्जुन आपल्याबरोबर घेऊन गेले. अमित कुमार हा जमीन विकून डंकीच्या माध्यमातून अमेरिकेला गेला होता. तिथे तो ट्रकचालक असून त्याचा मोठा अपघात झाला होता. त्याच गावातील तेजी मान या तरुणाने त्याची काळजी घेतली. अमेरिका भेटीत राहुल गांधींनी या ट्रकचालकांबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ते आज पहाटे अचानक आले. राहुल गांधींना भेटण्यासाठी गावात गर्दी झाली. पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी घरौंदा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र राठोड यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी निवडणूक प्रचाराबाबत चर्चा केली.
अमेरिकेत भेटलेल्या तरुणासाठीराहुल गांधी अचानक
