अमेरिकेत फेडरल रिझव्‍‌र्हने
पुन्हा व्याजदरात वाढ केली

वॉशिंग्टन: जगभरात बँका बुडीत जात असताना यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ०.२५ टक्के व्याजदर वाढीची घोषणा झाली. त्यामुळे फेडरल रिझर्व्हचे व्याजदर आता ४.७५ ते ५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत.
जागतिक अर्थव्यवस्था कोसळत आहे. पुन्हा एकदा मंदीचे सावट आहे. या सगळ्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर अमेरिकेतील व्याजदर आता ५ टक्के झाला आहे. यापूर्वी फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. विशेष म्हणजे २००८ मध्ये याचा फटका अमेरिकन कंपनी लेहमन ब्रदर्स दिवाळखोरीत निघाली होती. तेव्हाही व्याजदर तोच होता. तर पूर्वी अमेरिकेत दोन मोठ्या सिलिकॉन व्हॅली बँका आणि सिग्नेचर बँका व्याजदरात वाढ केल्यामुळे बुडाल्या आहेत. आता फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर आणि सर्वसामान्यांवरही होण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या ताज्या वाढीमुळे परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेत त्यांचा पैसा गुंतवू शकतात. असे झाल्यास भारतीय बाजारात विक्रीमध्ये घसरण होऊ शकते. त्यामुळे देशी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा रुपयावर परिणाम होऊ शकतो. रुपयाला वाचविण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजेच जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याचे ईएमआय पुन्हा एकदा वाढेल. याआधी, जेव्हा जेव्हा फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले, तेव्हा आरबीआयनेही व्याजदर वाढवले आहे. परिणामी, कर्जाच्या ईएमआयमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा फटका भारतीय बाजारपेठेवर व सर्वसामान्यांना बसणार आहे.

Scroll to Top