कॅलिफोर्निया – अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागातील सॅन बर्टाडीनो कंट्रीच्या जंगलात लागलेल्या भीषण वणव्यामुळे या भागातील ५०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.या भागातील ७ हजार एकराच्या जंगलात वणवा पेटला असून तो विझवण्यासाठी ५०० हून अधिक अग्निशमन दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग इतकी भीषण होती की एका तासाभरातच ३ हजार एकराचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सॅन बरनॅडिनो भागातील आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले. जंगलातील आगीमुळे वातावरणातील तापमानातही वाढ झाली असून संपूर्ण आसंमत धूरांच्या लोटांनी भरून गेला आहे. आगीपासून वाचण्यासाठी एकाच वेळेस हजारो लोकांना आपली घरे सोडण्याचा आदेश दिल्यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जमीनीवरुन व विमानाच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ही आग केवळ याच पट्ट्यात सिमीत राहिली. या भागातील धूरामुळे गंभीर परिणाम होऊ शकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.
अमेरिकेतील वणव्यामुळे ५०० कुटुंबांचे स्थलांतर
