नवी दिल्ली- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याचा इशारा दिला होता. त्याची लगेच अंमलबजावणी सुरू करून मेक्सिको, कोलंबिया, होंडुरास, ग्वाटेमाला, पेरू या शेजारी देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशांत परत धाडण्यात आले होते. त्यानंतर आता भारतीयांवरही प्रहार करीत अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या 205 भारतीयांना विमानात घालून आज सकाळी त्यांना भारतात परत धाडण्यात आले आहे. हे विमान थेट पंजाब मध्ये उतरणार असे सांगितले जात आहे. तिथून ते आपापल्या गावी जातील. विमानाचा किमान 16 तासांचा प्रवास आहे . मात्र 205 जणांना घेऊन येणाऱ्या या विमानात एकच शौचालय असून कोणत्याही सुविधा नाहीत अशी तक्रार आहे.
अमेरिकेत 18 हजार बेकायदेशीर राहणारे भारतीय आहेत . त्यांची पडताळणीही झाली आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने भारतात पाठवले जाणार आहे. अमेरिकन हवाईदलाचे सी -17 विमान आज पहिल्या 205 भारतीयांना टेक्सास येथून घेऊन निघाले. या सर्वांची पडताळणी केल्यावर ते भारतीय नागरिक असल्याचे भारत सरकारने मान्य केले आहे. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली. बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहत असलेल्या भारतीय नागरिकांचा स्वीकार करण्याचे भारताचे धोरण आहे,असे जयशंकर यांनी म्हटले.
ट्रम्प यांच्या धडक कारवाईचा बहुतांश विकसनशील देशांनी धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले आंतरराष्ट्रीय वजन आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून भारतीयांवरील कारवाई रोखतील अशी आशा व्यक्त होत होती. पुढील आठवडयात मोदी अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्यादरम्यान ते ट्रम्प यांची भेट घेऊन अमेरिकेतील बेकायदा भारतीयांच्या मुद्यावर काहीतरी तोडगा काढतील असेही म्हटले जात होते. मात्र त्याआधीच पहिले विमान रवाना झाल्याने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या सुमारे साडेसात लाख भारतीयांची चिंता वाढली आहे. नजीकच्या भविष्यात आपल्यावरही हकालपट्टीची कारवाई केली जाईल, अशी भीतीची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. मेक्सिको आणि कोलंबिया या देशांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांना घेऊन येणारी विमाने आपल्या देशात उतरवण्यास सुरुवातीला नकार दिला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने निर्बंध आणि आयातशुल्क लागू करण्याची धमकी दिल्यानंतर या देशांनी माघार घेतली. भारताने मात्र आपल्या नागरिकांना परत स्वीकारण्याच्या बाबतीत अमेरिकेला कुठलाही विरोध वा तक्रार केलेली नाही .
अमेरिकेतील बेकायदा भारतीयांना विमानाने परत धाडले! ट्रम्पचा प्रहार
